छत्रपती शिवाजी महाराज दिसतात
कसे, हा प्रश्न शंभरएक वर्षाखाली प्रत्येकालाच पडला होता. सन १९२० पर्यंत शिवाजी महाराजां एकही अधिकृत चित्र सर्वसामान्य लोकांसमोर आले
नव्हते. मराठ्यांच्या
इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्राची छायाप्रत
भारतात आणली आणि शिवाजी
महाराजांचे तेजस्वी रूप सर्वांसमोर आले. अर्थात, त्यानंतर बराच काळ लोटला आहे.
शिवाजी महाराजांच्या
हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर आठ-दहा वर्षांनी काढलेली अस्सल आणि ज्यांना आपण 'समकालीन' म्हणू शकतो, अशी तब्बल चौदा
चित्रे आज उपलब्ध आहेत. पण ही सर्व चित्रे शिवाजी महाराजांचीच आहेत हे कोणत्या निकषांवर ठरवले
गेले, हा प्रश्न काही
वर्षांपूर्वी पडला होता तेव्हा मदतीला अनेक ऐतिहासिक व्यक्ती धावून आल्या. त्यामध्ये परकालदास
होता, परमानंद होता, सभासद होता. कधी कधी थेव्हनॉट, एस्केलिऑट, हर्बर्ट डी यागर यांसारख्या परकीय व्यक्तीसुद्धा होत्या. हेन्री
ऑक्सेंडनच्या डायरीने तर संपूर्ण राज्याभिषेकाचा प्रसंग जिवंत केला. शिवाजी
महाराजांच्या हयातीत लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होते. त्याचमुळे, शिवाजी महाराजांचे वर्णन करणारे कित्येक समकालीन संदर्भ आज
उपलब्ध आहेत. ज्या ज्या लोकांनी शिवाजी महाराजांना पाहिले, त्यांनी महाराजांचे रूप आपल्या शब्दांत नोंदवून ठेवले,
तर काहींनी त्यांच्याविषयी माहिती जमा करून
लिहिली. या सर्वांच्या नोंदींचा मागोवा घेतल्यास शिवाजी महाराजांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व
आपल्या नजरेसमोर भक्कमपणे उभे राहते.
डॉ. बाळकृष्णलिखित 'शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व " हा लेख
वाचताना काही महत्त्वाच्या ऐतिहासिक
नोंदी नजरेस पडल्या. या नोंदी अनेक परकीय प्रवाशांनी, तसेच महाराजांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या परकीय
अभ्यासकांनी केलेल्या आहेत. डॉ. बाळकृष्ण म्हणजे कोल्हापूरच्या मातीतून तयार झालेले एक
महान व्यक्तिमत्त्व. लंडन विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त केलेले बाळकृष्ण कोल्हापूरच्या
राजाराम महाविद्यालयात
प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित
‘शिवाजी द ग्रेट' नावाने १६००
पृष्ठे असलेले चार खंड प्रकाशित केले. डॉ. बाळकृष्ण यांचे मराठ्यांच्या संशोधन
क्षेत्रातील योगदान प्रचंड मोठे आहे.
सदर लेखामध्ये त्यांनी अनेक परकीय प्रवाशांची नावे दिली आहेत ज्यामध्ये स्टिफन उस्टिक ( इंग्रजांचा राजदूत, इसवी सन १६७४), थॉमस निकोल्स (सन १६७३), हेन्री ऑक्सेंडन (सन १६७४), सेम्यूअल ऑस्टीन आर. जोन्स, एडवर्ड ऑस्टीन (सन १६७५), लेफ्ट. एडम्स आणि मॉलव्हेवर (सन १६७६) जॉन चाईल्ड (सन १६७८) आणि अजून अशी बरीच नावे सांगता येतील, ज्यांनी शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेतली. पण दुर्दैवाची बाब ही, की या सर्वांच्या लिखाणातून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन वाचायला मिळत नाही.
उदाहरणादाखल डॉ. बाळकृष्ण लिहितात, 'तेगनापट्टणम येथे असणाऱ्या डच वखारीचा प्रमुख मोठा नजराणा घेऊन जुलै
१६७७मध्ये शिवाजीराजांना भेटायला आला होता. याच महिन्यात फ्रेंचांचा ‘जर्मेन’ नावाचा प्रतिनिधी कोलेरून
नदीच्या किनाऱ्यावर भेटीसाठी दाखल झाला होता. या दोघांनी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी
कोठेही, कोणतीही नोंद करून ठेवलेली नाही.'
पण, तेगनापट्टणम् येथील डच वखारप्रमुख म्हणून जुलै ऑगस्ट दरम्यान शिवाजीराजांना भेटणारी व्यक्ती
ही दुसरी-तिसरी कुणी नसून 'हर्बर्ट डी यागर'' होय. खरेतर, बाळकृष्णांनी जेव्हा हे मत प्रकट केले त्यानंतरच्या काही वर्षांनी ग. ह. खरे यांना डी यागरच्या डायरीतील महत्त्वाच्या नोंदी मिळाल्या. त्याचे सर्वात पहिल्यांदा
भाषांतर करून प्रसिद्ध करण्याचे काम खऱ्यांनी केले. या हर्बर्टने शिवाजी महाराजांचे केलेले वर्णन
आपल्याला पुढे एका चित्राच्या संदर्भात वाचायला मिळेलच.
आधी आपण शिवाजी महाराजांविषयी
समकालीन साधनांमध्ये काय लिहून ठेवले आहे याचा आढावा घेऊ, मग या सर्व नोंदींची एकत्र चर्चा करणे योग्य ठरेल. काही जणांच्या चर्चेतून, ऐकण्यात आलेल्या गोष्टींवरून 'एस्केलिऑट' हा शिवाजीराजांचे वर्णन करताना लिहितो,
'मध्यम उंची आणि
प्रमाणबद्ध शरीर. राजा कामात क्रियाशील, नजरेत तीक्ष्ण, भेदक आणि वर्णाने
इतरांपेक्षा उजळ असून नेहमी स्मितहास्य करीत बोलतो. त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो.
थेव्हनॉटच्या दृष्टीने
शिवाजीराजा उंचीला कमी, पिवळट तपकिरी
रंगाचा होता. शिवाजीराजाचे
डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून, त्यामधून राजाची तीक्ष्ण बुद्धिमत्ता जाणवते. हा राजा नेहमी दिवसातून एकदाच जेवण
घेतो. त्याचे आरोग्य चांगले आहे.
फादर डी ऑर्किन्स म्हणतो,
'राजा चैतन्यशील, पण काहीसा अस्वस्थ वाटतो. मात्र, कितीही अस्वस्थ वाटला तरी तो निर्णयक्षमता आणि पुरुषार्थ यांत मुळीच कमी नाही.
अजून एक प्रसिद्ध परकीय
प्रवासी म्हणजे कॉस्मा दा गार्डा. गार्डाने शिवरायांवर लिहिलेले चरित्र "Vida E - Ccoens
Do Famoso E Felicissimo Sevagy' इसवी सन १७३०
मध्ये प्रकाशित केले. पोर्तुगीज भाषेतील हे शिवचरित्र इसवी सन १६९५ साली लिहून पूर्ण
झाले होते. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या एका पुस्तकात कॉस्माचा उल्लेख ‘शिवाजी महाराजांचा उत्साही
चाहता' असा केला आहे.' कॉस्माने केलेले शिवाजी महाराजांचे वर्णन आपल्याला अनेक
ठिकाणी सर्रास वाचायला मिळते. तो म्हणतो, 'राजा कामास जलद आणि त्याच्या चालीत उत्साह होता. त्याचा चेहरा स्वच्छ आणि वर्ण गौर होता.
विशेषतः त्याचे काळेभोर मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते, की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटते. यात त्याची चलाख, स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ता भरच टाकीत असे.
जोनाथन स्कॉट म्हणतो,
शिवाजीराजा आपल्या योजना चातुर्याने आखीत असे आणि चिकाटीने पूर्णत्वास
नेत असे. तो त्याच्या मनातील उद्दिष्टास पूरक ठरेल असेच निवडत असे. त्याच्या मनातील निश्चयाची
माहिती कोणालाही होत नसे. तो निश्चय प्रत्यक्षात उतरला की मगच ती माहिती सर्वांना कळत
असे. स्कॉटचे हे वर्णन अनेकांगाने
महत्त्वाचे वाटते.
पहिल्या सुरतेच्या स्वारीसमयी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या 'जॉन एस्केलिऑट' याने शिवाजी महाराजांविषयी वर्णन केलेले एक पत्र आज उपलब्ध आहे.
Post a Comment
Post a Comment